पिंपरी-चिंचवडमधील तरूणांनो “हाउज द जोश”; शुक्रवारी “उरी” चित्रपट मोफत पाहण्याचे आमदार जगतापांचे आवाहन

0
715

पिंपरी, दि. २५  – कारगिल विजय दिनानिमित्त युवकांमध्ये देशाच्या सैन्यांबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरातील पाच सिनेमागृहांमध्ये शुक्रवारी (दि. २६) “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा देशभक्तीपर हिंदी चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता या चित्रपटाचा शो सुरू होणार आहे. त्याचा पिंपरी-चिंचवडमधील युवकांनी आणि माजी सैनिकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या युद्धवीरांच्या आठवणी जागृत ठेवाव्यात, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कारगिलमध्ये झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. तसेच भारतात २६ जुलै हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या भारतीय युद्धवीरांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्याचे काम या विजय दिनाद्वारे केले जाते. ही देशाभिमानाची भावना आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी २६ जुलै हा विजय दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त राज्यातील सर्व युवकांना “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा देशभक्तीपर हिंदी चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा चित्रपट मोफत दाखवण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाच चित्रपटगृहांमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा चित्रपट मोफत दाखवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये पिंपरीतील अशोक टॉकिज, जयश्री चित्रपटगृह, विशाल ई-स्क्वेअर, आकुर्डीतील जय गणेश फेम आणि चिंचवडमधील बिग सिनेमा या पाच चित्रपटगृहांचा समावेश आहे.

या पाच चित्रपटगृहांमध्ये सकाळी १० वाजता “उरी द सर्जिकल स्ट्राइक” चित्रपटाचा शो सुरू होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील युवकांनी आणि माजी सैनिकांनी या देशभक्तीपर चित्रपटाचा लाभ घ्यावा. तरुणांमध्ये भारतीय सैन्याबद्दल अभिमान आणि आदर वाढावा म्हणून हा चित्रपट दाखवण्यात येत असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.”