पिंपरीतील दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी लांबवली ८ लाखांची रोकड

0
513

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – बंद दुकानाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात ठेवलेली तब्बल ८ लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. ही घटना सोमवार (दि.३) रात्री अकरा ते मंगळवार (दि.४) सकाळी दहाच्या दरम्यान पिंपरीत साई चौकातील जय प्लाझा या इमारतीच्या बेसमेंटमधील दुकान क्र. १,२,३ मध्ये घडली.

याप्रकरणी जोईताराम केसाराम चौधरी (वय ३५, रा. आनंदनगर, पिंपळे गुरव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे पिंपरी साई चौकातील जय प्लाझाच्या बेसमेंटमध्ये ओळीने तीन दुकान आहेत. सोमवार (दि.३) रात्री अकरा ते मंगळवार (दि.४) सकाळी दहाच्या दरम्यान दुकान कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच दुकानात ठेवलेली तब्बल ८ लाखांची रोख चोरुन नेली. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.