पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दिलदारपणा

0
174

– पोलिसांचे निलंबन, कार्यकर्त्यांवरची कारवाई मागे घेण्याची सुचना, पत्रकारावरही कारवाई नको

पुणे, दि. १२ (पीसीबी) – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याबाबात सुरू असलेल्या वादावर पडदा टाकून पुन्हा एकदा माफी मागत सगळ्यांना मोठ्या मनाने माफ केले आहे.फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा जाहिर माफी मागतो. माझ्या तोंडावर शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करत असल्याचे प्रसिध्दीपत्र पाटील यांनी काढले आहे. भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी प्रसिध्दी पत्र माध्यमांना दिले.

फुले, शाहू, आंबेकर यांनी भिक मागून शाळा उभ्या केल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांच्याकडून एका कार्यक्रमात आले होते. महाराष्ट्रात सर्व स्तरातून त्याचा जोरदार निषेध करण्यात आला. स्वतः पाटील यांनीही गांभिर्य ओळखून दिलगीरी व्यक्त केला होती. मात्र, शनिवारी चिंचवड येथे कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्या तोंडावर शाईफेकण्याच्या प्रकार झाला आणि वातावरण ढवळून निघाले. त्या प्रकऱणात शहरातील तीन कार्यकर्त्यांनी अटक करण्यात आली आणि तीन अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांचे निलंबन कऱण्यात आले. आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांवरचे आरोप, गुन्हे सगळे मागे घेण्याच्या सुचना पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत.

प्रसिध्दीपत्रात ते म्हणतात, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत . शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.

मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.