पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना

0
277

मुंबई, दि. २० (पीसीबी) : मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी आज सकाळी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांच्यासह चार मंत्री, सहा आमदारकोरोना बाधित होते. बहुतेक सर्वजण सुखरूपपणे बाहेर आले आहेत.

“मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंतीही अस्लम शेख यांनी केली. “मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.” असेही अस्लम शेख यांनी सांगितल.

अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. कोरोना काळात अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत.

या नेत्यांना कोरोनाची लागण, अनेकांनी केली मात
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह त्यांचे सचिव, पीए आणि काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. ते देखील कोरोनावर मात करुन बाहेर आले.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच आमदार मुक्ता टिळक यांनाही कोरोनाची लागण झाली. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची लागण झाली.  दौंडचे आमदार राहुल कुल यांनाही काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन, नाशिक देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

या राजकारण्यांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाविरोधातील लढाईत काही राजकीय नेत्यांचा बळी देखील गेला आहे.   मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर,  ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी, जळगावमधील रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना कोरोनामुळं जीव गमावावा लागला. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी, पडेगाव येथील शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले, राष्ट्रवादीचे सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचा देखील कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे.