कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यू

0
197

श्रीरामपूर, दि. २० (पीसीबी) : सोनई (ता. नेवासे) शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील एका डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर आज गावात नव्याने पंधरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केले असून घरोघरी आरोग्य तपासणी केली जात आहे. रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादमध्ये एका उद्योगात काम करणारा मूळचा सोनई येथील रहिवाशी असलेला गावात आला होता. त्याला कोरोनाची बाधा झाली. त्याच्या कुटुंबात विवाह सोहळा झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरलाही कोरोना झाला. नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. आज त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सोनई शहरात आज नव्याने पंधरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्राव घेण्यात आले होते. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. आज ३७ जणांची ही टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यापूर्वी एकाच दिवशी २२ जण कोरोनाबाधित आढळून आले होते. एकटय़ा सोनई शहरात सुमारे ३७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.