पानशेत येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द पुजारी जखमी

0
659

पुणे, दि. ७ (पीसीबी) – पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे- ओसाडे येथील शिवकालीन ओसाडजाई देवीच्या मंदिरातील वृध्द पुजाऱ्यावर बुधवारी (दि.६) बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले.

छबन महादेव जोरकर (वय ६६) असे हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्द पुजाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी जोरकस हे गाढ झोपेत असतानाच अचानक बिबट्याने यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाचे लचके तोडले. यावेळी जोरकर मोठ मोठ्याने ओरडू लागल्‍याने त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा नाना आणि पत्नी बायडाबाई घरातून धावत ओसरीवर आल्या. त्यावेळी त्यांना जोरकर यांच्या अंथरूणा शेजारी बिबट्या दिसला. समोर बिबट्‍याला पाहून नाना, बायडाबाई भयभीत झाले, मात्र प्रसंगावधानता दाखवत या दोघांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. या ओरडा – ओरडीमुळे बिबट्या तेथून पळून गेला.

यानंतर जखमी झालेल्‍या जोरकस यांना उपचारांसाठी खडकवासला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या स्थानिक रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याचे पथक पानशेत परिसरात तैनात करण्यात आले आहे.