पाणीपुरवठ्याचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्त सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांची सल्लागारपदी नियुक्ती

0
372

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – जलशुद्धीकरण केंद्र, आंद्रा, भामा आसखेड पाणीपुरवठ्याचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्त सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांची महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली. कोणतीही मुलाखत न घेता त्यांची 11 महिन्यांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, सेक्टर क्रमांक 23 येथील स्काडा सिस्टीम, भामा आसखेड येथील धरणातून महापालिकेस पाणी उपलब्ध करुन घेण्याबाबतचा प्रकल्प, आंद्रा प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्रातील प्रकल्पाची कामे कार्यान्वित आहेत. या प्रकल्पांच्या कामाचा अनुभव असलेल्या अभियंत्याची नेमणूक करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. त्यानुसार सेवानिवृत्त उपअभियंता, कार्यकारी अभियंता या पदावरील अधिका-यांची सल्लागार पदावर करार पद्धतीने दरमहा एकत्रित मानधनावर 11 महिने कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीसाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या एकमेव प्रवीण लडकत यांचा अर्ज प्राप्त झाला.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत अत्यावश्यक सेवेतील आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव लडकत धारण करत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडील कामकाजाची आवश्यकता विचारात घेता मौखिक मुलाखत न घेता सल्लागार पदावर लडकत यांना घेतले. त्याना शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे. सुमारे 70 हजार रूपये मानधन दिले जाण्याची शक्यता असून अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लडकत यांना काम करावे लागणार आहे.