पहिले कर्तव्य माझ्या जातीसाठी, त्यानंतर समाजासाठी; राजस्थानच्या महिला मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

0
896

जयपूर, दि. १ (पीसीबी) –  राजकीय नेते, मंत्री आणि वादग्रस्त विधान हे समीकरणच झाले आहे. नेत्यांमध्ये वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देण्याची जणू अहमहमिका सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. असेच एक वादग्रस्त विधान करून राजस्थानच्या  महिला मंत्र्यांने वाद ओढवून घेतला आहे.  

माझे प्रथम कर्तव्य हे माझ्या जातीसाठी आहे, त्यानंतर समाजासाठी आहे, असे वादग्रस्त विधान राजस्थानच्या महिला व बालविकास राज्यमंत्री ममता भूपेश यांनी केले आहे. या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अलवर जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण करताना ममता भूपेश यांनी हे विधान केले आहे.  त्यांच्या या विधानामुळे आता त्या  वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली आहे. नव्या  सरकारमध्ये  ममता भूपेश यांना महिला व बालविकास राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता त्यांनी केलेल्या विधानावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, या विधानावर  खुलासा करताना प्रत्येक व्यक्ती सन्मानाने राहावे आणि सर्वांसाठी काम करावे असे मला वाटते, असे सांगत ममता यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.