पवना धरण १०० टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली   

0
1549

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याची जीवनदायिनी असलेले पवना धरण या वर्षी पंधरा दिवसआधीच १०० टक्के भरल्याने वर्षभराच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जुलै महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी इतका पाऊस झाल्याने १५ ऑगस्टपर्यंत भरणारे धरण यंदा लवकर भरले आहे. त्यामुळे पिंपरी–चिंचवड शहराला वर्षभरासाठी लागणाऱ्या पाण्याची तजवीज झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पवना धरण रविवारी (दि. ५ ) पूर्णक्षमतेने भरले. या वर्षी जुलै महिन्यातच पावसाने सरासरी गाठली होती. त्यामुळे धरण लवकर भरण्यास मदत झाली. तर ऑगस्टच्या सुरूवातीला मावळ तालुक्याच्या पश्चिमेला चांगला पाऊस पडत होता. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. धरण पूर्णक्षमतेने भरल्याने मावळ तालुक्यातील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे पवना धरणावर अवलंबून आहे. पिण्याचे पाणी आणि उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा पवना धरणातून केला जातो. त्यामुळे दरवर्षी धरण भरण्याकडे प्रशासनासह नागरिकांचे लक्ष असते.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यासह सर्वांची चिंता वाढली होती. मात्र, रविवारीपासून धरण परिसरात पावसाचा चांगलाच जोर वाढल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली. परिणामी धरण १०० टक्के भरले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून २ हजार २१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती शाखाधिकारी ए. एम गदवाल यांनी दिली. धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.