पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

0
328

पिंपरी,दि.7 (पीसीबी) : “प्रत्येक झाडाकडे आपली घरातील व्यक्ती या भावनेने पाहिल्यास वृक्षसंवर्धन सहज शक्य होईल!” असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे यांनी सुदर्शननगर, चिंचवड येथे रविवार, दिनांक ०६ जून २०२१ रोजी व्यक्त केले. जागतिक पर्यावरणदिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर नाळे बोलत होते. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, गोलांडे मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, हरितयुग प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बेडसे, सचिव सागर भोईर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी हरितयुग प्रतिष्ठानचे जगदीश घुले यांनी मार्गदर्शन करताना, “वृक्ष लावणे सोपे आहे; परंतु सातत्याने त्याची जोपासना करणे कठीण काम आहे. सध्याच्या काळात गुळवेल या वनस्पतीचे सत्त्व हे प्रतिकारशक्तीसाठी खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वृक्षारोपण करताना कटाक्षाने औषधीयुक्त, पारंपरिक देशी रोप-वेलींचे रोपण केले पाहिजे. विदेशी झाडांपेक्षा आपल्या पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या वृक्षांकडे पशू, पक्षी, फुलपाखरे आकर्षित होतात. त्यामुळे जैविक साखळी टिकून राहण्यास मदत होते!” असे विचार मांडले. राजाभाऊ गोलांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सातत्याने दहा वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धन यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना पवना, इंद्रायणी या नद्यांचे शुद्धीकरण केल्यास परिसरातील पर्यावरणाचा समतोल साधला जाईल, असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा!’ अशी सामुदायिक उद्घोषणा करीत सुनंदा माटे आणि राजेंद्र बेडसे यांच्या हस्ते अनुक्रमे कांचन आणि वड या वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच सातत्याने दहा वर्षे वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या सखाराम पाटील यांचा ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनात ॲड. अविनाश गोलांडे, विजय राजपाठक, प्रवीण भोकरे, केशव कोल्हापुरे, अनिल करंदीकर, आनंद मुथा, प्रदीप गांधलीकर यांनी परिश्रम घेतले. माधव जोशी यांनी आभार मानले.