“पब्जी” खेळण्यापासून रोखल्याने महिलेला शेजाऱ्यांकडून जबर मारहाण

0
690

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – पब्जी गेम खेळण्यापासून रोखल्याने एका महिलेला तिच्याच सोसायटीतील शेजारच्या लोकांनी जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास डोंबिवलीजवळ ठाकुर्ली येथील विशाल भोईर इमारतीत घडली.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दीप्ती वेदांत या महिलेने आपल्या इमारतीच्या जिन्यावर बसून पब्जी खेळणाऱ्या काही तरुण-तरुणींना विरोध केला. त्याच सोसायटीत राहणारे मनिष कदम यांची मुले ही जिन्यामध्ये पब्जी गेम खेळत बसायचे. दिप्ती यांनी त्यांना अनेकवेळा खेळण्यास मनाई केली होती. रविवारी रात्री ही मुले पब्जी गेम खेळत असताना दिप्ती यांनी त्यांना पुन्हा विरोध केला. याचा राग मनात धरून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कदम कुटुंबियांनी दिप्ती यांच्याशी भांडणाला सुरूवात केली. हे भांडण इतक वाढल की मीना कदम, मनीष कदम, मानसी कदम, आणि मानसीची मैत्रीण गरिमा त्रिवेदी यांनी दीप्ती यांना इमारतीतच बेदम मारहाण केली. जबर माराहण झाल्याने जखमी झालेल्या दीप्ती यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रामनगर पोलिस तपास करत आहेत.