पत्नीसह कामावर निघालेल्या व्यक्तीला दगडाने मारून जीवे मारण्याची धमकी

0
297

पिंपरी, दि.3 (पीसीबी) : पत्नीसोबत कामावर निघालेल्या एका व्यक्तीला एकाने दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर ‘आता जिवंत सोडतो, परत मला दिसला तर तुझा मर्डर करिन’ अशी धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 30) सकाळी दहा वाजता भीमशक्ती चिखली येथे घडली.

संपत मारुती शिंदे (वय 55, रा. भीमशक्ती नगर, चिखली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश खोब्रागडे (रा. भीमशक्ती नगर, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहा वाजता फिर्यादी शिंदे आणि त्यांच्या पत्नीला कामाला जात होते. भीमशक्ती नगर येथील सिद्धीपार्क समोरील रोडवर आल्यावर आरोपी गणेश याने फिर्यादी यांना ‘काय रे बेवड्या कुठे चालला’ असे म्हटले. यावर फिर्यादी यांनी गणेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेशने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर रोडवर पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. ‘आता जिवंत सोडतो, परत मला दिसला तर तुझा मर्डर करिन’ अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.