पंतप्रधानपदावर लवकरच मराठी माणूस दिसेल; मुख्यमंत्र्यांचे सुचक विधान  

0
2011

नागपूर, दि. ५ (पीसीबी) –  देशाच्या पंतप्रधानपदावर २०५० पर्यंत  अनेक मराठी माणूस  विराजमान झाल्याचे दिसून येईल, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.४) नागपूर येथे केले.

जागतिक मराठी अकादमीतर्फे नागपूर येथे १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ कवी आणि अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि आशुतोष शेवाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, २०५० पर्यंत देशाला एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील. त्याची फार काळ वाट पहावी लागणार  नाही. मराठी माणूस पंतप्रधानपदी दिसेल! जगाच्या कानाकोपऱ्यात मराठीचा झेंडा उंचावण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी एक नव्हे तर अधिक मराठी व्यक्ती आपण निश्चित पाहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षणावर ते म्हणाले की, देश आज संक्रमणावस्थेत आहे. आरक्षणाच्या विषयावर  येणारा काळच उपाय योजना सुचवेल.  संधीचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी क्षेत्रात संधी आहे. मात्र ती मिळवण्यासाठी तसा समाज तयार करावा लागणार आहे.