पंकजानं चार-पाचवेळा माझी चौकशी केली – धनंजय मुंडे

0
340

 

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या आजाराच्या काळात बहीण पंकजा मुंडे यांनी चार ते पाच वेळा फोन करून आपली चौकशी केल्याचे धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या टीकांमुळे दोघेही अधिक दुरावल्याची चर्चा होती. मात्र, कोरोनाच्या काळात पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांची आपुलकीनं चौकशी केली.

धनंजय मुंडे म्हणाले, “2011-12 पासून आमच्या कुटुंबात फारसा संवाद नव्हता. एखादी दु:खाची किंवा आनंदाची घटना असेल, तरच आम्ही एकत्र येतो. मात्र, मला कोरोना झाल्याचं कळाल्यानंतर पंकजांनी मला फोन केला. चार-पाच वेळा त्यांनी माझी चौकशी केली. मी बरा व्हावा यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या.”

“कुटुंबात दोन राजकीय विचारधारा याआधी आल्या आहेत. पण राजकारण आणि कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे अशी माझी नेहमी इच्छा राहिली आहे. त्या इच्छेला अनुसरुन माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला. ज्याच्याशी इतकं वर्ष बोलणं नाही त्याने फोन करुन प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणं यामुळे नक्कीच फरक पडतो,” अशा भावनाही धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या