राज ठाकरेंचे `कृष्णकुंज` कोरोनाच्या विळख्यात

0
500

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. यासह राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाने थेट कृष्णकुंजवर धडक दिल्याने मनसैनिकही काळजीत पडल्याचं पाहायला मिळत आहे.

सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर त्याचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासह राज ठाकरेंच्या आजूबाजूला कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 7 वर पोहचली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2 वाहनचालकांना याआधीच ‘कोरोना’ची लागण झाली होती. आता पुन्हा एका चालकाला संसर्ग झाल्याने एकूण 3 वाहन चालकांना कोरोना संसर्ग झाला आहे. वाहन चालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केलीय. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.