नोटाबंदीचा काळा पैशावर काहीही परिणाम झालेला नाही – ओ पी रावत

0
622

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – नोटाबंदीच्या निर्णयाचे उद्दिष्ट साध्य झाले नसून  काळा पैशावर काही परिणाम झालेला नाही, अशी टीका मुख्य निवडणूक आयुक्त पदावरुन निवृत्त होणाऱ्या ओ पी रावत यांनी केली आहे. निवडणुकीदरम्यान आयोगाने  मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.   

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या  विधानसभा निवडणुकांदरम्यान आम्ही जप्त केलेली रक्कम जवळपास २०० कोटी होते. यावरुन निवडणुकीदरम्यान येणारा पैसा हा प्रभावी लोकांकडून येत असून अशा प्रकारच्या निर्णयांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे असे  रावत म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. यामुळे काळा पैसा उघड होईल, तसेच भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा दावा केला होता. मात्र ओ पी रावत यांच्या म्हणण्यानुसार, नोटाबंदीमुळे काळा पैशावर काहीच फरक पडलेला  दिसत नसल्याचे समोर आले आहे.