नेटकऱ्याचा बाप काढणं महापौरांच्या आलं अंगलट; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर सोशल मीडियावर टीकेची झोड

0
390

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकर यांना चांगलंच महागात पडलं आहे. नेटकऱ्याने लसीसंदर्भात पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात त्यांना उत्तर दिलं. यानंतर सोशल मीडियावर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्या ट्रोल होऊ लागल्या. अखेर त्यांना ते ट्विट डिलीट करावं लागलं. किशोरी पेडणेकर यांनी आपली एक मुलाखत आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.
या ट्विटवर एका व्यक्तीने ‘कंत्राट कोणाला दिले?’ असा प्रश्न विचारला असता यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं.

Image

हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात सर्वत्र टीका होऊ लागली. आणि त्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं. महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला आहे. “मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असं भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनीदेखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.