नितेश राणे यांच्यावर टांगती तलवार

0
437

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर आता नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

नितेश राणे यांच्यावतीने मुकूल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टात तरी दिलासा मिळतो का हे पहावं लागेल. दिलासा न मिळाल्यास नितेश राणेंवर कारवाईची शक्यता आहे.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला, मात्र मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसंच ही घटना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश यांच्या याचिकेवर निर्णय देण्याचे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर हा अर्ज फेटाळण्यात आला.