निगडीत सात अल्पवयीन मुलांकडून ४ लाखांच्या ५६ सायकली जप्त

0
1106

निगडी, दि. २८ (पीसीबी) – सात अल्पवयीन मुलांकडून तब्बल ४ लाख १७ हजार ५०० रुपये किमतीच्या ५६ चोरीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांच्या पथकाने निगडीतील अंकुश चौक, चिकन चौक आणि निगडी नाक्याजवळ केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांचे पथक निगडी पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी रमेश मावसकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली, कि  महागड्या चोरीच्या सायकली घेऊन काही मुले अंकुश चौक, चिकन चौक आणि निगडी नाक्याजवळ उभी आहेत. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित अल्पवयीन मुलांची विचारपुस केली. मात्र त्या मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी  पिंपरी-चिंचवड शहरातून फ्री मोशन, हयुज आणि स्नेल किस्टो अशा या महागड्या कंपन्यांच्या तब्बल ५६ सायकली चोरल्याचे कबुल केली. पोलिसांनी या ५६ सायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.