नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक..

0
240

नाशिक, दि. 24 (पीसीबी): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाच फोडले आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे.
जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.

नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलेली असतानाच सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.