नातीच्या स्वागतासाठी आजोबाने मागविले हेलिकॉप्टर

0
841

पुणे, दि. २७ (पीसीबी) : कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी सार्थक ठरवित बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडूरंग बालवडकर यांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून नातीच्या जन्माचे जंगी स्वागत सुनेचे माहेर मांजरी फार्म शेवाळवाडी, पुणे येथून सासरी पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथील निवास स्थानी नातीला आणि सूनेला चक्क हेलिकॉप्टरने घरी घेवून आले.

भौतिकदृष्ट्या समाज कितीही सुधारला असला, तरी आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझं अशीच चुकीची समजूत कायम असल्याचं उघडकीस येणार्‍या भ्रूणहत्यांवरून समोर येतं. तर दुसरीकडे याच जुन्या विचारांना तिलांजली देत मुलीच्या जन्माचं आनंदाने स्वागत केल्याचीही उदाहरण बघायला मिळातात. मुलीच्या जन्माच्या जंगी स्वागताची अशीच एक घटना पुणे शहरातील बालेवाडी येथे घडलीये. अजित पांडूरंग बालवडकर आणि संगीता अजित बालवाडकर यांच्या मुलगा कृष्णा बालवडकर, सून अक्षता बालवडकर यांना पहिला मुलगा क्रियांश असून दुसरी मुलगी क्रिशिका जन्माला आली आहे.

अजित पांडूरंग बालवडकर यांची इच्छा होती की, शाही थाटात आपल्या नातीचे स्वागत करयचे म्हणून सुनेच्या माहेरातून सूने सोबत क्रिशिका नातीला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठविले .ऐवढेच नव्हेतर पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथे हेलीपॅडचा निर्माण करण्यात आला. घरी वाजत, गाजत, फुलांनी सजविलेल्या कारने घरी आणले. तसेच गुलाबांच्या पाखळ्यांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.आत्या नीलम दिनेश पिंजन, कोमल संदेश आव्हाळे, सुषमा ऋषिकेश गायकवाड, मावशी अंकिता सुरेश शेवाळे, मामा यश सुरेश शेवाळे यांनीही मुलीचे स्वागत केले
अलिकडच्या काळात अनेकांकडून मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. असाच एका मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव पुणे शहरात चर्चिला जात आहे.
नातीला चक्कं हेलिकॉप्टरने घरी आणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अजित पांडूरंग बालवडकर यांनी याद्वारे बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेशही दिला