नागपूरात आई-वडिलांनी दिवाळीच्या शॉपींगला नेले नाही म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

0
629

नागपूर, दि. २ (पीसीबी) – आई-वडिलांनी दिवाळीच्या शॉपिंगसाठी न नेल्याने एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नागपूर येथील वसंतनगरमधील जुना बाबुळखेडा भागातून मंगळवारी (दि.३० ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली.

पायल दत्तराज करडभाजने असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दत्तराज, त्यांच्या पत्नी, लहान मुलगी व मुलगा हे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेले होते. ‘तू नेहमी ऑनलाइन खरेदी करते, आताही तुझ्या पसंतीचे ऑनलाइन कपडे मागून घे,’ असे ते पायलला म्हणाले. करडभाजने कुटुंब खरेदी करून आले. वडिलांनी खरेदीसाठी न नेल्याने पायलला दु:ख झाले. मंगळवारी सकाळी तिने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पायल खोलीतून बाहेर न आल्याने दत्तराज यांनी तिला आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून बघितले असता पायल गळफास लावलेली दिसली. त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अजनी पोलिसांचा तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मृत पायल ही धनवटे कॉलेजमध्ये बी. कॉम (सीएस) द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील हे शेतकरी आहेत.