नागपुरात ट्रकचालकाला छताला बांधून जबर मारहाण

0
396

नागपुर, दि. २९ (पीसीबी) – गोदामातला माल संबंधित स्थळी न पोहचवता त्या कामासाठी दिलेले पैसे खर्च केल्याने ट्रक मालक आणि त्याच्या साथीदाराने एका ट्रकचालकाला छताला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विकी सुनील आगलावे असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवासेनेचा तालुका प्रमुख अखिल पोहनकर आणि त्याचा साथीदार अमित ठाकरे या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवासेना तालुका प्रमुख अखिल पोहनकरच्या टक्रवर विकी आगलावे हा चालक म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून काम करतो. आठवड्याभरापूर्वी वाडी येथील गोदामातून त्रिवेंद्रम येथील ट्रकमध्ये काही माल भरण्यात आला होता. तो माल त्रिवेंद्रमला पोस्त करायचा होता. यासाठी विकीने अॅडव्हान्स म्हणून ३० हजार रुपये आणि डिझेल भरण्यासाठी ३ हजार असे एकूण ३३ हजार रुपये अखिल पोहनकरकडून घेतले होते. त्यानंतर विकीने हा ट्रक त्रिवेंद्रमला न नेता अन्य ठिकाणी नेऊन ठेवला. तसेच अखिलने अॅडव्हान्स म्हणून दिलेले पैसेही खर्च केले. याबाबत अखिला कळताच त्याने विकीचा शोध घेतला. शनिवारी विकी त्यांना सापडला. ज्यानंतर विकीला त्याने आपल्या एका साथीदारासह वडधमना येथील वाहतूक कार्यालयात नेले. तिथे त्याला छताला लटकवून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अखिल पोहनकर आणि त्याचा साथीदार अमित ठाकरे या दोघांना अटक केली आहे.