नांदेड मध्ये साथ प्रतिबंधक कायदा धाब्यावर; गुरुद्वाराच्या कार्यक्रमाला रेलचेल, गुन्हा दाखल

0
209

नांदेड, दि. २७ (पीसीबी) : दसऱ्याच्या निमित्तानं काढलेल्या पारंपरिक हल्लाबोल मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले याप्रकरणी अधिक तपास करतायत. हल्लाबोल मिरवणुकीसाठी उच्च न्यायालयाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करावा, असे आदेश दिले होते, मात्र यावेळी मोठी गर्दी जमल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांची नांदेड गुरुद्वारा कमिटीकडून पायमल्ली करण्यात आली आहे.

दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या हल्लाबोल मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या सूचनांचे गुरुद्वारा कमिटीकडून उल्लंघन करण्यात आलं. कोरोनाचे सगळे नियम नांदेड गुरुद्वारा कमिटीनं धाब्यावर बसवले आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसऱ्यानिमित्त दरवर्षी हल्लाबोल मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे काही ठरावीक लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.