‘नशीब! इम्रान खान माझे इतिहास-भूगोलाचे शिक्षक नव्हते’; आनंद महिंद्रांचा सणसणीत टोला

0
383

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – ‘इम्रान खान माझे इतिहास किंवा भूगोल शिकवायला नव्हते यासाठी मी देवाचा खूप आभारी आहे,’ असे मत महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर नोंदवले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी इम्रान खान यांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांनी इतिहासाचा चुकीचा दाखला देण्याबरोबरच जगाचा भूगोलही बदलला आहे. यावरुन महिंद्रा यांनी इम्रान यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. कलम ३७० रद्द करणे भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे भारताने सर्वच देशांना ठामपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर इम्रान खान सरकारने प्रयत्न करुनही पाकिस्तानला या प्रकरणामध्ये कोणत्याही देशाने थेट पाठिंबा दिलेला नाही. पाकिस्तानने भारताबरोबरच सर्व व्यापारी संबंध ताडकाफडकी रद्द केले आहेत. भारतापेक्षा पाकिस्तानलाच याचा जास्त फटका बसत आहे. असे असले तरी इम्रान खान सरकारकडून भारतावर टीका केली जा आहे. मात्र आता या टीकेमधील तर्कशुद्धपणा हरवत चालल्याचे नुकत्याच व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमधून समोर आले आहे.

भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधील व्यापारी संबंध संपवण्याचा निर्णय घेणारे इम्रान खान या व्हिडिओमध्ये शेजारी देशांनी कसे रहायला हवे हे सांगाताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनी सलोख्याने राहत असल्याचे म्हटले आहे. इतकचं नाही तर इम्रान खान यांनी जपान आणि जर्मनीच्या सीमा एकमेकांना लागून असल्याचा जावई शोध लावला आहे. ‘जपान आणि जर्मनीने त्यांच्या एकमेकांना लागून असलेल्या सीमा भागांमध्ये कारखाने स्थापन केले आहेत असे इम्रान खान काही मंत्र्यांना संबोधित करताना बोलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ‘जास्त व्यापार केल्याने दोन शेजारी देशांमधील संबंध जास्त घनिष्ठ होतात. जास्त व्यापार केल्यास देश जास्त जवळ येतात. दोन देशांमधील संबंध जास्त दृढ होतात. जर्मनी आणि जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये एकमेकांच्या देशातील लाखो लोकांना ठार केले. मात्र युद्धानंतर जर्मनी आणि जपानच्या संयुक्त सीमेवर त्यांनी एकत्र येऊन उद्योग सुरु केले. त्यामुळे आता त्यांचे आर्थिक हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले असल्याने त्यांमध्ये वाद नाहीय,’ असं या व्हिडिओमध्ये इम्रान खान सांगतात.

हा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी ट्विट करताना ‘मला इतिहासाचा किंवा भूगोलाचा अशा शिक्षक दिला नाही त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे,’ असा सणसणीत टोला लगावला आहे.