आमदार प्रणिती शिंदे अडचणीत; पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाने बजावले वॉरंट

0
533

सोलापूर, दि. २८ (पीसीबी) – पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी वॉरंट बजावले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात हजर झालेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह सात जणांना सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवस अंतरिम जामीन वाढवून दिला आहे.

काय आहे प्रकरण?

जिल्हा नियोजन समितीची २ जानेवारी २0१८ रोजी बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करीत गाडी अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी करून ढकलाढकली केली. यात पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला. या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह आंदोलकांवर सदर बझार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल आणि सुनावण्या सुरु झाल्या. खटल्याच्या एकाही तारखेला प्रणिती हजर राहिल्या नाहीत. यामुळे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांना वॉरंट बजावला आहे.