नवी दिल्लीत राहुल गांधी-शरद पवारांची भेट

0
470

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राजधानी दिल्लीमध्ये   काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (बुधवार) संध्याकाळी  भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

शरद पवारांच्या ६ जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे माजी खासदार प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते. शरद पवारांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबत चांगली चर्चा झाली, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी, याबाबत चर्चा झाल्याचे ट्विट पवारांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. केवळ ८ जागांचा पेच बाकी आहे. आघाडीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ४० जागांच्या वाटपावर  शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित ८ जागांबाबत एकमत झालेले नाही. या ८ जागापैकी कोणी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर  या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.