नववर्षाची भेट; अनुदानित, विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात कपात

0
692

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी)  – सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने देशातील ग्राहकांना  नववर्षाची भेट दिली आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. अनुदानित गॅस सिलिंडरचे दर ५.९१ रुपयांनी आणि विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर १२०.५० रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईल कार्पोरेशने आज (सोमवार) ही घोषणा केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे  गेल्या काही दिवसांमध्ये  पेट्रोल आणि डिझेलचे दरात  सातत्याने घसरण होत आहे. या वर्षांतील पेट्रोलच्या नीचांकी दराची काही दिवसांपूर्वीच नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरात घसरण होऊ लागली आहे.  त्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरचा दराही तेल कंपन्यांकडून  कपात करण्यात आली आहे.  यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन दर १ जानेवारीपासून लागू होणार आहेत. डिसेंबरमध्ये दुसऱ्यांदा एलपीजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. याआधी १ डिसेंबर रोजी ६.५२ रुपये कपात करण्यात आली होती. तर, विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १३३ रुपयांनी कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या दरात घट झाली असून डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे दरात कपात करण्यात आल्याचे इंडियन ऑइलने म्हटले आहे.