नवनीत राणा यांचा छळ, राष्ट्रीय महिला आयोगाकडे भाजपा खासदाराचे गाऱ्हाणे

0
421

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याने मुंबई गाठली. त्यानंतर मुंबईत शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. या प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, आता या प्रकरणात वेगळे वळण येताना दिसून येत आहे. नवनीत राणा यांच्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच संदर्भात भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी एक पत्रही लिहिलं आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला एक पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं, खासदार नवनीत राणा यांच्यासोबत जेलमध्ये होत असलेल्या दुर्व्यवहाराची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावी आणि चौकशी करावी. अमरावती जिल्ह्याच्या जनप्रतिनिधी खासदार नवनीत राणा यांची महाविनाश आघाडीद्वारे केलेली अटक आणि जेलमध्ये त्यांच्यासोबत होत असलेला अन्याय हा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा अपमान आहे. महिला शोषणाचे एक निंदनीय उदाहरण आहे. जेलमध्ये पाणी तसेच महिला प्रसाधन गृहा पासून नवनीत राणा यांना जाणूनबुजून वंचित ठेवलं गेलं ही महिलाच नव्हे तर मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. एका जनजातीय-मागासवर्गीय महिला जनप्रतिनिधी सोबत अशी प्रताडणा होत असेल, तर इतर माता भगिनींचे जे हाल होत असतील यांची कल्पनाच न केलेली बरी.