नवनीत राणा चक्क पोलिसांचा चहापान घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस आयुक्त म्हणतात…

0
282

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती किती खोटारडे आहेत याचा एक पुरावाच पोलिसांनी सोशल मीडियावर दिला आहे. तो व्हिडीओ पाहून लोकांनी राणा बाईंची अगदी यथेच्छ धुलाई केली आहे.

‘मातोश्री’विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिले असून त्यामध्ये हा आरोप केला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

संजय पांडे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,’ असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झालं आहे.

पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे. तिथे कसलाही लगबग, गोंधळ दिसत नाही. पांडे यांनी हा व्हिडीओ ट्विट करत एकप्रकारे राणा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत या आरोपांना दुजोरा दिला होता. दरम्यान, सध्या रवी राणा व नवनीत राणा न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राणा म्हणाल्या आहेत की “आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिले नाही. तसेच माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी रविवारी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात आहे. माझ्याबदल खालच्या दर्जात बोलले जात आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, नवनीत राणा यांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणांना पिण्याचे पाणीही देण्यात आलेले नाही. एवढंच नव्हे तर त्यांना वॉशरुमलाही जाऊ दिले नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. राणांना तुरूंगात दिली जाणारी वागणूक लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.

आता लोकशाहीबद्दल ओरडणारे कुठे आहेत? नवनीत राणा यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी वकिलांच्यामार्फत लोकसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून एका खासदाराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह असेल तर तो आम्ही रोज करायला तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले होते.