नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणे, ही ‘आणीबाणी’ – उध्दव ठाकरे   

0
441

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ज्येष्ठ साहित्यिका  नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून पाठवलेले निमंत्रण रद्द करणे ही ‘यवतमाळची आणीबाणी’  आहे, अशी  टीका शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’  च्या अग्रलेखातून  संमेलनाचे आयोजक आणि साहित्यिकांच्या भूमिकेवर ठाकरे यांनी  रोखठोक  भाष्य केले.

‘स्वतंत्र बाण्याच्या लेखिका नयनतारा सहगल यांची भूमिका न पटणारी आहे म्हणून त्यांचा बोलता गळा दाबणे मराठी साहित्य संमेलनवाल्यांना शोभणारे नाही.  ‘१९७५च्या पूर्वी देशात हीच स्थिती होती. गुप्त  भयाच्या आणि कारस्थानाच्या सावल्या फिरत होत्या. त्याचे रूपांतर एके मध्यरात्री आणीबाणीत झाले. अशाच गुप्त भयाच्या सावल्या यवतमाळच्या साहित्य संमेलनावर फिरताना कुणाला दिसल्या काय आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय?, असा सवाल  करून ठाकरे यांनी संमेलनाचे आयोजक आणि सरकारवर  तोफ डागली आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘नयनतारा यांनी संमेलनास येणे म्हणजे सरकारी मेहेरबानीस मुकणे असा व्यापारी विचार संमेलन आयोजकांनी केलेला दिसतो. नयनतारा व्यासपीठावर आहेत म्हणून कदाचित मुख्यमंत्री महाशयांनी येण्याचे टाळले असते. त्यामुळे नयनतारा यांनाच टाळून लेखक-साहित्यिकांनी स्वाभिमान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आपल्याच हातांनी केला. आता कोणत्या तोंडाने तुम्ही गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणार?’ असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.