नगरसेविका ममता गायकवाड जिजाऊ सावित्री भूषण पुरस्काराने सन्मानित

0
189

पिंपरी, दि.१५ (पीसीबी) – मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व ज्ञानज्योति सावित्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका ममता गायकवाड यांना यंदाचा ‘जिजाऊ सावित्री समाज भूषण’ पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

थेरगाव येथील जिजाऊ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी मा. नगरसेविका जनाबाई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर, राजश्री शिरवळकर मोनिका भोसले, चैताली भोईर इ. प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते म्हणाले, संभाजी ब्रिगेड ही संघटना जनसामान्यांसाठी काम करते. सामान्यांच्या प्रश्नांसाठी आजवर विविध प्रकारची आंदोलने केली. विविध सामाजिक उपक्रम राबविले. महिलांना व युवकांना प्रोत्साहन दिले. याचाच एक भाग म्हणून आज ‘जिजाऊ सावित्री भूषण’ पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.

पुरस्कार प्राप्त नगरसेविका ममता गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘आजवर मी सावित्री – जिजाऊंचा आदर्श घेवूनच समाजासाठी कार्य करत आहे, हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. तसेच माझी जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. येथून पुढे या पुरस्काराचा सन्मान ठेवूनच मी समाजासाठी कार्यरत राहीन.
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी राजमाता जिजाऊ यांचे स्वराज्य उभारण्यातील योगदान तसेच सावित्रीमाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. सावित्रीमाईमुळेच महिलांना शिक्षणाची दारे उघडली, असे मत डॉ. मुगळीकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव म्हणाले, समाजामध्ये अन्याय अत्याचार वाढला होता. सर्वत्र अदिलशहा, निजामशहा व मोगलांच्या सत्ता जनतेवर अत्याचार करीत होत्या. हा अन्याय अत्याचार दूर करून रयतेचे राज्य निर्माण होण्यासाठी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज घडविले. तसेच महिलांना शिक्षणाची दरवाजे या देशात बंद होती. अंधश्रद्धा वाढल्या होत्या. म्हणून महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीमाईंना प्रथम शिक्षण दिले. याच सावित्रीमाईंनी अन्याय-अत्याचार सहन करून पुण्यात महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. महिलांना शिक्षित केले म्हणून सावित्रीबाई याच खऱ्या विद्येच्या देवता आहेत, असे प्रतिपादन केले.

स्वामी विवेकानंदाविषयी खरी माहिती आजवर समाजाच्या पुढे आली नाही. खरे तर त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ठ रुढी-परंपरा व अंधश्रद्धा विरोधात आवाज उठविला, प्रबोधन केले या विषयीची माहिती दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या पुस्तकातून तसेच मराठा सेवा संघ, शिवधर्म दिनदर्शिका २०२१ मधून मिळते.

याप्रसंगी उपस्थित सर्वांना राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योति सावित्री व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परमेश्वर जाधव यांनी सुत्रसंचालन केले, उपाध्यक्ष सतिश काळे यांनी आभार मानले. यानिमित्त ज्ञानेश्वर लोभे, विनोद घोडके, निकील गनुचे, निरंजन माने, समिक्षा बादाडे, फातिमा अन्सारी, दीपक मोहिते, यांनी विशेष परिश्रम घेतले.