धोकादायकरित्या सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या दोघांना अटक

0
278

रावेत, दि. ५ (पीसीबी) – धोकादायकरित्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत चोरी आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघासह गॅस एजन्सी चालक-मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी सचिन भोंडवे चाळ, लक्ष्मीनगर, रावेत येथे घडली.

टेम्पो चालक लवकुश जवारसिंग कुमार (वय 22), करण चुनौदीलाल माहोर (वय 20, दोघे रा. लक्ष्मीनगर, रावेत. मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांसह गॅस एजन्सी चालक मालक पंकज गादिया (वय 35, रा. रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक अनिल महाजन यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज गादिया याची पंकज गॅस एजन्सी आहे. या गॅस एजन्सीमध्ये आरोपी लवकुश आणि करण हे दोघे काम करतात. आरोपींनी आपसात संगणमत करून धोकादायकरित्या एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस काढला. हा गॅस चोरून घेत असताना आरोपींनी कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नाही. गॅस चोरी करत ग्राहकांची फसवणूक केली. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास सचिन भोंडवे चाळ, रावेत येथे कारवाई करत एक रिक्षा (एम एच 14 / व्ही 8502) आणि अन्य मुद्देमाल असा एकूण 88 हजार 323 रुपयांचा ऐवज जप्त केला. कामगारांना गॅस एजन्सी चालकाने गॅस चोरी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबाबत त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.