धनादेश न वटल्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्यासह कारखान्यांच्या संचालकांवर दोषारोपपत्र

0
807

बीड, दि. २ (पीसीबी) – साखर कारखान्याच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना देण्यात आलेला ४० लाख रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह कारखान्याच्या संचालकांवर  अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामुळे मुंडे अडचणीत अडकण्याची शक्यता आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी येथील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते (रा.तळणी ता.अंबाजोगाई) या शेतकऱ्याची जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला ४० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, हा धनादेश न वटल्यामुळे धंनजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून धनंजय मुंडे यांच्यासह कारखान्याचे संचालक वाल्मीक कराड, सूर्यभान मुंडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी या प्रकरणात तिघांना नोटिसा बजावल्या आहेत.