धनंजय मुंडेंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी; हायकोर्टात याचिका दाखल

0
319

मुंबई,दि.१५(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. धनंजय मुंडे यांनी समाजापासून आपल्याला आणखी दोन मुले असल्याची माहिती दडवून ठेवली. निवडणुकीपूर्वी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्याबाबत खोटी माहिती दिली. असा आरोप करत धनंजय मुंडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या. अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी जनशक्ति संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

एका महिलेनं लैंगिक अत्याचाराचा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात केला. त्याला उत्तर देताना मुंडे यांनी एका अन्य महिलेशी परस्पर सहमतीनं विवाहबाह्य संबंध ठेवले. त्यातून आपल्याला दोन अपत्य असल्याची कबुली समाजमाध्यमावर दिली. त्यांची सर्वस्वी जबाबादारीही त्यांनी स्वीकारली असल्याचं मुंडे यांनी कबूल केलं. मात्र मुंडे यांनी साल २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नामनिर्देश अर्जामध्ये या दोन मुलांची माहिती दडवली आहे. त्यात त्यांनी आपल्याला केवळ दोन मुली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी जयश्री मुंडे असतानाही अन्य पासून एक मुलगा आणि एक मुलगी दोन अपत्यं असल्याने मुंडे यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी आयपीसी कलम 420 आणि 125 (अ)अन्वये निवडणूक आयोगासमोर खोटं प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्या, अशी मागणी या याचिकेतून केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.