धक्कादायक: सांगवीत त्रास देते म्हणून दिड वर्षाच्या मुलीला दिले चटके; कामवाल्या बाईविरोधात गुन्हा

0
554

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – त्रास देते या कारणावरुन दिड वर्षाच्या मुलीचा संभाळ करणाऱ्या कामवाल्या बाईने मुलीच्या दोनही हातांवर चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार (दि.२०) दुपारी दिड ते रात्री दहाच्या दरम्यान जुनी सांगवी ममतानगर गल्ली क्र. २ येथे घडली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या २८ वर्षीय आईने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कामवाल्या बाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलीची आई ही खाजगी क्षेत्रात नोकरी करते. यामुळे त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला संभाळण्यासाठी त्यांनी घरात एक कामवाली बाई ठेवली होती. शनिवारी रात्री महिला घरी आल्यावर तिच्या दिड वर्षाच्या मुलीच्या दोनही हातांवर चटके दिल्याचे निदर्शनास आले. यावर महिलेने कामवाल्या बाई विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये मुलगी त्रास देत असल्याने कामवाल्या बाईने तिला चटके दिल्याचे म्हटले आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.