धक्कादायक; पत्नीचा खून करून मृतदेह घराशेजारीच पुरला

0
434

नगर, दि.३ (पीसीबी) – पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह घराशेजारीच शेडमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.हि घटना नगर शहराजवळील दरेवाडी गावात घडली.

राजकन्या महादेव आगाशे (५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशे कुटुंबीय मूळचे नांदेड येथील आहे, सुमारे चार वर्षांपूर्वी कामधंद्यासाठी नगर शहराजवळील दरेवाडी येथे ते स्थायिक झाले. त्यांना दोन मुले आहेत. राजकन्या दरेवाडीतच भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. परंतु तीन दिवसांपासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. मात्र या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली नव्हती. आज सकाळी परिसरातील लोकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी ही माहिती भिंगारच्या कँप पोलिसांना कळवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत. शेडमध्ये राजकन्या यांचा मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरलेला आढळला. पोलिसांनी परिसरात चौकशी करुन काही नातेवाईकांना ताब्यात घेतले, नंतर तपासा दरम्यान पती-पत्नीच्या भांडणातूनच हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पती व पत्नीत वारंवार भांडणे होत होती. त्यातूनच महादेव याने दि. २९ सप्टेंबरच्या रात्री राजकन्या हिचा दोरीने गळा आवळून खून केला व मृतदेह, घराशेजारील पत्र्याच्या शेडजवळ जमिनीत पुरला. भिंगारच्या कॅप पोलिसांनी महादेव संभाजी आगाशे (रा. दरेवाडी, नगर) याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.