धक्कादायक: आठ वर्षांच्या मुलाने दीड वर्षाच्या बाळाची नाल्यात बुडवून केली हत्या

0
443

फतेहपूर, दि. ३० (पीसीबी) – एका ८ वर्षांच्या चिमुरड्याने नाल्यात बुडवून दीड वर्षाच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतल्या फतेहपूर बेरी भागात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिलला दक्षिण दिल्लीच्या फतेहपूर बेरी भागात दीड वर्षांचा हा मुलगा त्याच्या आई आणि बहिणीसोबत घराच्या छतावर झोपला होता. घराच्या छतावरूनच आठ वर्षांच्या मुलाने या मुलाला झोपेतच उचलले आणि घराशेजारी असलेल्या नाल्यात बुडवले. त्यानंतर त्याला पुन्हा बाहेर काढले आणि पुन्हा बुडवले त्यानंतर त्याच्यावर दगड आणि विटांच्या तुकड्याचा मारा केला. त्यानंतर त्याला नाल्यात फेकून दिले. हा मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. शोध घेतल्यावर दीड वर्षांच्या मुलाचा मृतदेह पोलिसांना नाल्यात आढळला.

ही घटना कशी काय घडली याचा शोध घेताना पोलिसांच्या लक्षात आले की त्याच भागात रहाणारा एक आठ वर्षांचा मुलगाही गायब आहे. पोलिसांनी त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. शोध घ्यायला सुरूवात केल्यापासून तीन तासात पोलिसांनी त्याला शोधले. या मुलाची चौकशी केली असता या मुलाने आपणच सूड घेण्याच्या भावनेतून दीड वर्षाच्या मुलाला संपवले अशी कबुली दिली आहे. आठ वर्षांच्या मुलाने हत्येची कबुली दिल्याचे ऐकून पोलीसही चाट पडले. दरम्यान या मुलाला आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर उभे केले जाणार आहे. त्यानंतर त्याला शिक्षा सुनावली जाईल.