देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे म्हणजेच इतिहासाचा जागर, यशाचे स्मरण करण्याची संधी

0
564

– महापौर माई ढोरे यांचे प्रतिपादन
– पिंपरी चिंचवड शहरात “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमाला सूरूवात

पिंपरी,दि. १ (पीसीबी) : प्रगतीशील भारताची ७५ वर्षे, भारत, भारतीय नागरिक, भारतीय संस्कृती आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचे विविध क्षेत्रांमधील यश यांचे स्मरण करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव नागरिकांना समर्पित करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांच्या योगदानामुळेच भारत आपल्या दीर्घकाळाच्या प्रवासामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठू शकला आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्याची ७५ वर्षाच्या इतिहासाचा जागर आणि यशाचे स्मरण करण्याची संधी शहरवासीयांना उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

भारत सरकारमार्फत “आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “आझादी का अमृत महोत्सव” हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी सलग ७५ तास विविध उपक्रमांच्या माध्यमातून दि. १ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आज महापालिका ड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी, उद्यान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसेविका उषा मुंढे, निर्मला कुटे, आरती चौंधे, सिमाताई चौघुले, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, महोत्सवाचे समन्वय तथा शहर अभियंता राजन पाटील, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता अशोक भालकर, क्षेत्रिय अधिकारी उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, विलास देसले, बाबासाहेब गलबले, सहाय्यक आरोग्य अधिकारी अजय जाधव, उपअभियंता चंद्रकांत मोरे, सुनिल नरोटे, स्वप्नील शिर्के, उप अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, ज्येष्ठ नागरिक मल्हारराव ऐळवे, प्रकाश बंडेवार, डॉ. डी.बी.कोकाटे. रावसाहेब चौघुले, ज्ञानेश्वर जम्बुरे, राजेंद्र काटे, श्रीकांत हंसारे, पांडूरंग पाटील, शांताराम डोईफोडे, शांताराम शितोळे, दत्तु कांबळे, ‍विष्णु घारे, आदिती निकम, कल्पना कोकाटे, सीमा देडके आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्यासह स्थानिक नगरसदस्य/ नगरसदस्या यांनी सहभाग नोंदविला.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेचे विविध विभाग व अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह क्षेत्रिय कार्यालयांमार्फत दि.०१ ते ०३ ऑक्टोंबर २०२१ (तीन ‍दिवस) सलग ७५ तास “आझादी का अमृत महोत्सव” हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांसाठी सलग तीन दिवस लसीकरण मोहीमेला सूरूवात झाली आहे. त्यानुसार महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला सकाळी ७:३० वाजता वृक्षारोपणाने सुरुवात झाली. योग सत्र, झुम्बा, जिजामाता हास्य क्लबचा हास्य कार्यक्रम, इंदौरच्या धरतीवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे पथनाटय, वॉल पेटींग यासह ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले गार्डनचा शुभारंभ यावेळी महापौर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. उद्यान परिसरात संस्कार भारती या गृपने काढलेल्या रांगोळीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणा-या क्षेत्रिय कार्यालयांमार्फत सूरू असलेल्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होवून आझादी का अमृत महोत्सवाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.