“देशात राज्याचा कारभार नंबर वन आहे; नक्कीच बाळासाहेब आम्हाला आशीर्वाद देत असतील”

0
397

मुंबई,दि.२३(पीसीबी) – ‘आज बाळासाहेबांचा आमच्यासाठी जन्मदिवस असून आजही बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. आज जे काही महाराष्ट्राचे, शिवसेनेचं, महाविकास आघाडीचं चाललं आहे त्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो कायम असणार आहे, अशा भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. त्यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांनाअभिवादन केलं.

‘बाळासाहेबांनी जे काही पुण्य केलं त्या पुण्याईवर महाराष्ट्र आणि मराठी माणूस टिकून आहे. याबाबत आम्हाला आनंद आहे,’ असं नमूद करतानाच ‘आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. देशात राज्याचा कारभार नंबर वन आहे. उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. नक्कीच बाळासाहेब जिथं कुठं असतील तिथून ते आनंदात दोन्ही हातांनी आम्हाला आशीर्वाद देत असतील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘आमचं प्रत्येक पाऊल बाळासाहेबांनी जो मार्ग दिलाय त्याच दिशेनं जाईल. आमच्यावर कितीही संकट येवो त्या संकटाशी लढण्याची आणि विजयाची प्रेरणा बाळासाहेब देतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.