दुष्काळाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

0
463

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून त्या भागात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातील ही भेट नजीकच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुकीची राज्यातील चौथ्या व अखेरच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळ निवारणाच्या कामाबाबत पवार यांच्याकडे काही तक्रारी केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख आणि आमदार भारत भालके यांच्यासोबत पवार यांनी त्यावेळी चर्चा केली होती.

दुष्काळग्रस्त भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्र्यांकडे भेट निश्चित झाल्यानंतर त्या दोघा आमदारांनी यावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत भेट ठरल्यास आपणास निरोप देण्यात येईल, असेही त्या आमदारांना सांगण्यात आले आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शुक्रवार दुपारपर्यंत भेट झाली नव्हती. याबाबत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना संपर्क साधला असता त्यांनी आपण सांगोल्यात असल्याचे सांगितले. तर आमदार भारत भालके हे त्यांच्या पंढरपूरमधील मतदारसंघात होते.