“दिवाळीमध्ये कमीत कमी फटाके फोडा आणि प्रदूषण थांबवा” – लता मंगेशकर

0
366

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. फटाकेबंदीच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. फटाके बंदीचा निर्णय घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्वीट करत जनतेला आवाहन केलं आहे.

लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी आज जे सांगितलं, त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीमध्ये कमीत कमी फटाके फोडा आणि प्रदूषण थांबवा. प्रकाशाचं पर्व साजरं करा, दीपोत्सव साजरं करा. मास्क नक्की लावा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची आणि समाजाची काळजी घ्या. असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं.

फटाक्यांवर बंदी आणता येईल, परंतु स्वत:हून आपण बंधन घालून घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्ही बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. डॉक्टर्स, अन्य यंत्रणा यांच्यावर खूप ताण आहे. हे ते कुणासाठी करत आहेत? तुमच्यासाठीच ना? आपली आजवरची मेहनत प्रदुषणामुळे व्यर्थ जायला नको. बंदी आणून मी तुमच्यावर आणीबाणी नाही आणत आहे. एक दुसर्‍याच्या विश्वासावर हा आनंद, सण साजरा करू. अन्य ठिकाणी प्रदुषण अधिक आहे. कोरोना आजार श्वसन संस्थेशी निगडित आहे. प्रदुषणामुळे जर हा आकडा वाढत असेल तर दिवाळीत आपण फटाके वाजवणं थांबवू शकतो का? आपण जिद्दीने हा आलेख खाली आणला आहे. आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे, राज्यातही नियंत्रणात आला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.