दारू ढोसणाऱ्यांना केजरीवाल यांचा दणका – दिल्लीत ७० टक्के अधिकचा कर – १००० रुपयेंची बाटली १७०० रुपयांना

0
325

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मद्यशौकिनांना जोरदार झटका दिला आहे. दिल्लीमध्ये दारु विक्रीवर ‘विशेष कोरोना शुल्क’ लावला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळणार आहे. आज (5 मे) सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.

याचा अर्थ असा की, दारुच्या एमआरपीवर 70 टक्के कर अधिक वसूल केला जाणार आहे. समजा दिल्लीमध्ये दारुची एक बॉटल 1000 रुपयांना मिळत असेल तर आता ग्राहकांना त्यासाठी 1700 रुपये मोजावे लागतील. दारुच्या दुकानांबाहेर गर्दी हटवण्याचा उपाय म्हणून दिल्ली सरकारच्या या निर्णयाकडे पाहिलं जात आहे.

गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला. ग्रीन आणि झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली. तसंच रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. यानंतर देशभरात जवळपास 40 दिवसांनी दारुची दुकानं पुन्हा सुरु झाली आणि मद्यप्रेमींची, तळीरामांची दारु खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले.