दहशतवादी मसूदवर बंदीसाठी चीनने भारतावर घातली होती पाकवर हल्ला न करण्याची अट

0
670

बीजिंग, दि. ३ (पीसीबी) – जैशचा म्होरक्या मसूद अझरला आता जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. पण याआधी मसूदचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी चीनने भारतासमोर अटी ठेवल्या होत्या. त्यावेळी भारताने चीनच्या सर्व अटी धुडकावून लावल्या होत्या.

भारताने पाकिस्तानवर हल्ला करु नये तसेच पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करावा या दोन अटींवर चीन मसूदच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रात भारताचे समर्थन करायला तयार होता. पण भारताने यामागण्या धुडकावून लावल्या. १४ फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. जैशने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ला घडवणाऱ्यांना सोडणार नाही असे त्यावेळीच जाहीर केले होते. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइक या १२ दिवसांमध्ये जागतिक समुदायाने भारताचा स्वसंरक्षणाचा अधिकार मान्य केला होता. याचा अर्थ पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली तर जागतिक स्तरावरुन विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता.

भारत-पाकिस्तान संघर्ष होऊ नये यासाठी चीनचे प्रयत्न सुरु होते. तणाव कमी करण्याच्या बदल्यात अझरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव चीनने भारतीय अधिकाऱ्यांना दिला होता. २०१६, २०१७ मध्ये चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपल्या नकाराधिकाराचा वापर करुन मसूद अझरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेशाचा मार्ग रोखून धरला होता. भारताने थेट पाकिस्तानशी चर्चा करावी अशी चीनची त्यावेळी भूमिका होता. आता जागतिक दबावासमोर चीनला नमते घ्यावे लागले.