दबावाचे राजकारण करण्याची भाजपला गरज नाही; शरद पवारांनी आत्मचिंतन करावे – मुख्यमंत्री

0
638

नागपूर, दि. २८ (पीसीबी) – कुणावर दबाव टाकून पक्षात घ्यावे,  अशी भाजपची स्थिती सध्यातरी नाही. उलट आपले नेते पक्ष सोडून का जात आहेत? याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आत्मचिंतन करावे, असे  प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पवारांच्या आरोपांना दिले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजप पक्षांतरासाठी दबाव टाकत आहे,  असा आरोप  शरद पवार यांना  आज (रविवार) पुण्यात पत्रकार परिषदेत केला. या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी चोख उत्तर दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र सगळ्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. ईडीची चौकशी सुरु असलेल्या नेत्यांना पक्षात घेतले जाणार नाही, असेही  त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची ताकद आता वाढली आहे. कुणाला पक्षात बोलावण्याची वेळ भाजपवर नाही. लोकांच्या मागे धावण्याची गरज सध्या भाजपला नाही. लोक आमच्याकडे येतात, त्यातील जे चांगले आहेत, लोकाभिमुख आहेत त्यांना आम्ही पक्षात नक्की घेऊ. मात्र दबावाचे राजकारण करण्याची भाजपला गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजप सरकारने  अनेक अडचणीतील कारखान्यांना सरकारच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांची यादी मोठी आहे. पक्षात घेण्यासाठी त्यांना मदत केलेली नाही, त्यामुळे शरद पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपले लोक सोडून का जात आहेत, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी  दिला.