थेरगावच्या विभाजनातून वाकड विभागीय करसंकलन कार्यालयाची निर्मिती; नागरिकांचा वेळ वाचणार…

0
399

पिंपरी दि. ८ (पीसीबी)- वाकडसह अन्य पाच गावांतील रहिवाशांना मिळकतकर भरण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून थेरगाव करसंकलन कार्यालयावर अवलंबून राहावे लागत असे मात्र थेरगाव विभागाच्या विभाजनातून स्वतंत्र वाकड विभागीय करसंकलन कार्यालयाची निर्मिती करण्यात आल्याने थेरगाववरील ताण कमी होऊन वाकड, ताथवडे, पुनावळेकरांना ह्या स्वतंत्र कार्यालामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्या हस्ते फित कापुन व श्रीफळ वाढवून या नूतन कार्यालयाचे आज (मंगळवारी) उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, विक्रम वाघमारे, सहायक मंडल अधिकारी राजाराम सरगर, मुख्य लिपिक अरुण चौधरी आदी उपस्थित होते. स्वतंत्र वाकड करसंकलन विभागाच्या निर्मितीसाठी राहुल कलाटे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून महापालिका प्रशासनाशी सातत्याने
पाठपुरावा व पत्र व्यवहार केला होता अखेर त्यांना यात यश आले. करसंकलन विभागाच्या रूपाने पहिल्यांदाच वाकडमध्ये शासकीय कार्यालय स्थापन झाले आहे.

वाकडला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्वाधिक कर भरणाऱ्या वाकडकरांसाठी भविष्यात महापालिकेचे क्षेत्रीय तथा विविध प्रशासकीय कार्यालये, पोस्ट ऑफिस उभारण्याचा मानस असल्याचे कलाटे म्हणाले. याठिकाणी मुख्य लिपीक, चार कनिष्ठ लिपिक, चार शिपाई अशा नऊ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यालयातंर्गत वाकड, ताथवडे, पुनावळे गावातील साठ हजार मिळकतींचे 191 कोटी 27 लाख
इतका महसूल संकलित होणार असून येत्या काही महिन्यात अन्य नवीन तीन हजार मिळकतींची
दफ्तरी नोंद होणार असल्याने महसुलात वाढ होणार आहे.

महानगरपालिकेत वाकड मधून सर्वाधिक व ऑनलाईन कर भरणा केला जातो, तसेच या भागात झपाट्याने डेव्हलोपमेंट सुरू असल्याने मिळकतींचा आकडा वाढतच जाणार असल्याने वाकडच्या निर्मितीने कामात सुसूत्रता येणार आहे. थेरगाव करसंकलनकडे तीन व वाकड विभागावर तीन गावांची स्वतंत्र जबाबदारी असल्याने पूर्वीच्या थेरगाव कार्यालयावरील लोड कमी होऊन कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल. काम जलद व सुलभ होईल नागरिकांचा वेळ वाचेल आणि हेलपाटे मारण्याचा त्रास ही कमी होईल .