त्या तरुणांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला मारहाण करत लुटले; कारण….

0
187

पिंपरी, दि. 7 (पीसीबी) – वीशीतील तरुणांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडून जबरदस्तीने 8 हजार रूपये काढून घेतले. तसेच, त्याच सोसायटीच्या काचा, सीसीटिव्ही आणि फिर्यादी यांची चारचाकीची तोडफोड केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे तीन ट्रकवर दगड मारून त्याचे नुकसान केलं. शिवसाई पार्क, यशवंतनगर याठिकाणी शुक्रवारी (दि. 05) रात्री अकराच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी पाच तरुणाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आरोपी रोहित मुकिदा पवार (वय 19, रा. भोसरी) व अविनाश नागनाथ माने (वय 20, रा. भोसरी) यांना अटक करण्यात आले आहे. तर, शंकर चौधरी (वय 20, यशवंतनगर, पिंपरी) व आणखी दोन आरोपी यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रामशंकर उदयराज गुप्ता (वय 55, रा. शिवसाई पार्क सोसायटी, यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामशंकर शुक्रवारी (दि. 05) रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या पटवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ऑफिस बंद करून राहत्या शिवसाई पार्क सोसायटीत पोहचले. त्यावेळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबलेल्या आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या खिशातील 8000 रूपये काढून घेतले. आरोपींनी सोसायटीच्या काचा फोडून तिथे लावलेला सीसीटीव्ही देखील फोडला. फिर्यादी यांच्या (एमएच 14 / डीटी 9813) या चारचाकीच्या काचा फोडल्या.

त्यानंतर आरोपी फिर्यादी यांच्या पटवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ऑफिस समोर पोहोचले. त्याठिकाणी पार्क केलेले (एमएच 14 / सीपी 7113), (एमएच 14 / जीयु 7813) व (एमएच 14 / बीजी 0943) या ट्रकवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या व दहशत निर्माण केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.