‘त्या’ गुन्हयातील मुख्य सूत्रधार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात; डेहराडून मधून केली अटक

0
296

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – सोनोग्राफी आणि एक्सरे मशीनवर कर्ज असतानाही त्याबाबत मशीन खरेदी करणाऱ्या संस्थेला माहिती न देता त्याची विक्री करणाऱ्या एका दाम्पत्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सुत्रधार आरोपीला पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेने डेहराडून येथून अटक केली आहे.

डॉ. मनीष नंदलाल तरडेजा (रा. जुना नेरुळ, नवी मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याची पत्नी रचना मनीष तरडेजा हिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रचनाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. याप्रकरणी संदीप भोगीलाल शहा (वय 48, रा. महर्षीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा प्रकार ऑक्टोबर 2018 पासून 18 फेब्रुवारी 2021 या कालावधीत यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, पिंपरी येथे घडला होता. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2021 रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शहा यांची रुबी हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रा. ली नावाची कंपनी आहे. त्या कंपनीमार्फत ते वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. आरोपी हे वे टू डायग्नोस्टिक प्रा ली कंपनीचे डायरेक्टर आहेत. आरोपींनी माता बाल रुग्णालय बेलापूर येथील सोनोग्राफी मशीन, जनरल हॉस्पिटल नेरुळ येथील एक्सरे मशीन, जनरल हॉस्पिटल वाशी येथील दोन सोनोग्राफी मशीन, जनरल हॉस्पिटल ऐरोली येथील एक्सरे मशीन फिर्यादी यांच्या कंपनीला विकल्या होत्या. आरोपींनी विकलेल्या मशीनवर बँकेचे कर्ज होते. त्याची माहिती आरोपींनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली. यामध्ये फिर्यादी यांची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत आरोपीचा माग काढून त्याला उत्तराखंड मधील डेहराडून येथून अटक केली आहे. आरोपीने आणखी काही लोकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार त्याच्याकडे चौकशी केली जाणार असून अनेक रोचक तथ्य तपासातून बाहेर येणार आहेत.