‘त्या’ अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही’; राऊत भडकले

0
254

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं ते म्हणाले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून शिवसेना-नारायण राणे यांच्यातला वाद चांगलाच चिघळला आहे. दोन्ही बाजूने टीकेची झोड उठतीय. आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. या सगळ्यात एकमेकांना लक्ष्य करताना शेलक्या शब्दांचा प्रयोग होत आहे. राणे कुटुंब आणि सामना अग्रलेखातून देखील असे शब्दप्रयोग होत आहेत. परंतु राऊतांचे अग्रलेखातील घाव विरोधकांच्या वर्मी लागत आहेत.

याच भाषेवर आक्षेप नोंदवत सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपच्या तक्रार नोंदविण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचविषयी आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता राऊतांनी आक्रमक उत्तर दिलं. सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे…. त्या अग्रलेखांची जबाबदारी या संजय राऊतची… रश्मी ठाकरेंची नाही, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्यासाठी नारायण राणे यांनी चांगले काम करुन देश पुढे न्यायला हवा. पण ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करणार असतील तर शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक टीकेची परंपरा आहे. तशी टीका झाल्यास शिवसेना त्याचे स्वागत करेल, असेही राऊत यांनी सांगितले.