त्यांना काय माहिती की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे – अजित पवार

0
525

मुंबई,दि.५(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पडला. यावेळी अजित पवार बोलत होते.

“मला आठवतय बरोबर सहा वर्षापूर्वी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहामध्ये मी माझा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना सगळे विरोधीपक्षाचे आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळातही माझ्यासमोरच्या विरोधी बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर ठेऊन अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा त्याच्यातील बारकावे लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. माझ्या मनाला इतकं वाईट वाटतं होतं की हे इतकं बारकाईने ऐकतायत थोडसं यांना मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत आहे. फडणवीस अतीशय शांतपणे ऐकत होते. तर मुनगंटीवार अगदी जोरजोरात घोषणा देत होते. गिरिष महाजन तर विचारुच नका. त्यांना काय माहिती की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे. पुढं याच्याच हाताखाली काम करायचं आहे,” अशी टीप्पणी अजित पवारांनी केली. यानंतर सभागृहामधील सर्वच नेते हसू लागले.

दरम्यान, फडणवीसांनी लिहिलेल्या पुस्तकातून मला जानवायला लागलं आहे की देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता. त्यामुळे तुम्ही राजकारण सोडून तुम्ही लेखक व्हायला हरकत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.